Thursday, November 1, 2018

वार्षिक अहवाल वाचन सन २०१७-२०१८. १९ ऑगस्ट २०१७ संत सेना पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यावेळी १८० पेक्षा जास्त नाभिक बांधव उपस्थित होते. संत सेना पुण्यतिथीसाठी एकूण १७,८५६ रुपये वर्गणी जमा झाली. फोंडा विभाग - २६०० रुपये, कनेडी विभाग - १२०० रुपये, तळेरे विभाग - १८०० रुपये , नांदगाव विभाग - ८०० रुपये, खारेपाटण विभाग - ११०० रुपये, कणकवली विभाग - १०,३३० रुपये , तळी जमा - २६ रुपये ….एकूण जमा रक्कम - १७,८५६ रुपये. झालेला खर्च : २५ शाली, भेटवस्तू फाईली, बाजार, १०० प्रमाणपत्रे, दशावतारी नाटक , नारळ व इतर बाजार, आचारी खर्च, आचारी मदतनीस, सिलिंडर, पुष्पगुच्छ, गुलाबपुष्पे, भांडी भाडे,माईक भाडे व इतर खर्च मिळून एकूण १७, ८४२ रुपये खर्च होऊन १४ रुपये अखेर शिल्लक आहेत. मागील वर्षात एकूण ६ ते ७ सभा घेण्यात आल्या. त्यामध्ये दोन सभा कार्यकारिणी सभा व शहर सभा झाल्या. गणेश चतुर्थी काळात सोमवारी दुकाने स्वेच्छेने उघडी ठेवण्याबाबत ठरविण्यात आले. नवीन शिकाऊ मुलां-मुलींसाठी सेमिनार घेणेविषयी ठरविण्यात आले. परंतु अजून त्यावर कार्यवाही झालेली नाही. हुशार, गरीब, होतकरू नाभिक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शनाचे आवाहन करण्यात आले होते. कोणीही आपली नावे न दिल्याने एक दिवसीय मार्गदर्शन वर्ग यंदा तरी घेण्याविषयी नियोजन होईल. दर सभेमध्ये आपल्या ज्ञातीबांधवांचे वाढदिवस मंडळाच्या वतीने समारंभपूर्वक साजरे केले जातात.एक केक आणून त्याचे सामूहिकरीत्या कर्तन करून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या जातात. सोबत काहीवेळा शक्य असल्यास मंडळामार्फत शुभेच्छा कार्डही दिले जाते. यासाठी यावर्षी सर्व नाभिक आपल्या वाढदिवसाच्या निमित्त आपल्या संघटनेला देणगी देऊन सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. तसेच सर्वांनी आपले वाढदिवस लेखी स्वरुपात आज स्वागतकक्षात सही करताना पुढे लिहिण्यास विनंती आहे. अक्कलकोट नाभिक बांधव मेळावा १५, १६ नोव्हेंबर २०१७ रोजी संपन्न झाला त्यावेळी कणकवली तालुक्यामधून अनेक नाभिक बांधव त्यात सहभागी झाले होते. २५ डिसेंबर २०१७ रोजी अनिल अणावकर, चंद्रशेखर चव्हाण, दशरथ चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेली १ दिवसीय नाभिक वारी संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधी ठरली. त्यामध्ये २०० पेक्षा अधिक नाभिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. दरवर्षी कणकवली शहर मंडळ भालचंद्र महाराज जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमाच्या पालखी सोहळ्यामध्ये आपले नाभिक बांधव स्वच्छतादूत बनून पालखीमागे पडणारा कचरा साफ करत जाण्याचे काम करत आहेत. यावर्षी त्यामध्ये इतर विभागसुद्धा हिरीरीने भाग घेतील याबद्दल खात्री आहे. महिलांचे अधिकार या विषयावर देखील सभेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले होते. यावरून असे लक्षात घ्यावे कि आपली संघटना फक्त सलूनधारकांपुरती मर्यादित नसून त्याला आता अधिक विस्तारित रूप प्राप्त होत चालले आहे. ४ ऑगस्ट रोजी कणकवली तालुका नाभिक मंडळाच्या वतीने जीवन संजीवन सेवा ट्रस्ट अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या अणाव येथील आनंदाश्रय निराधार केंद्राला भेट दिली. त्यांना “ कृष्ण “ हा अनमोल ग्रंथ भेट देणेत आला. तसेच कणकवली महिला नाभिक मंडळाच्या वतीने सर्व आजी-आजोबांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. चंद्रशेखर चव्हाण व दशरथ चव्हाण या बंधूनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सर्व निराधार आजी- आजोबांना फळे, बिस्कीटपुडे वाटले. तसेच २००१ रुपयांची आर्थिक मदत दिली. काही सभांमध्ये नाभिक सलून बांधवांना सूचना दिल्या जातात. त्यांच्याकडून काही चुका होत असतील तर त्यांना मार्गदर्शन केले जाते. तरुण मुली, महिला यांच्याशी वागताना आदरपूर्वक कसे वागता येईल याविषयी अधिक काळजीपूर्वक माहिती देण्यात आली आहे. या वर्षी पासून कणकवली तालुक्यातील सर्व सलुन मध्ये काम करणारे नाभिक एकाच ड्रेसकोडमध्ये दिसणार आहेत. त्यासाठी तयारी सुरु आहे. लोगो व कापड यांची आजच निवड करणेस आपणास विनंती आहे. त्याचप्रमाणे आपणास वर्षभरासाठी लागणारे शर्ट यांची संख्या आपण कळवल्यास एकत्रितपणे कापड खरेदी केल्यास ५५ रुपये मीटरप्रमाणे आपणास कहरच अपेक्षीत आहे. तसेच लोगो साठी ३०० लोगो छपाईसाठी दिल्यास तो आपणास १० रुपयांना एक याप्रमाणे मिळू शकतो. दिवाळीच्या दिवशी आपण सर्वांनी एकाच वेळी एकाच दिवशी सगळीकडे ड्रेसकोड सुरु करीत आहोत तरी कृपया सर्व विभागांनी याची नोंद घ्यावी. आपली नोंदणी व आपल्याला लागणारी रक्कम जर आपण पुढच्या सभेत आणलात तर त्यानंतरच्या आढवड्यात आपल्याला कापड व लोगो मिळू शकतो. त्यानंतर तुम्ही तुमच्या नेहमीच्या टेलरकडे शर्ट शिवून घेऊ शकता. कापडाच्या नंबरप्रमाणे तुम्ही स्वतःदेखील कापड खरेदी करून शिवू शकता. कापड मंडळाकडेच घेतले पाहिजे अशी सक्ती नाही. या वर्षी आपण संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त ३०० रुपयांची भरीव अशी देणगी दिल्याबद्दल कणकवली तालुका शाखेच्या वतीने आपले शतशः आभार व्यक्त करीत आहोत. ज्यांनी देणगी दिली नसेल व आज देऊ इच्छित असतील ते रीतसर पावती घेऊन देणगी देऊ शकतात. आपण देणगी द्याल याबाबत आम्हाला नेहमीच खात्री वाटत आली आहे. देणगीदारांचे आम्ही स्वागत करतो व पुन्हा एकदा आभार मानतो. वार्षिक सदस्य नोंदणी अभियान सुरु झाले आहे. जास्तीत जास्त लोकांनी यात सहभाग घेतला आहे. दरवर्षी आपण नाभिक संघटनेच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सदस्यत्व वर्गणी फक्त ५० रुपये देऊन सदस्य व्हायचे आहे. ५० रुपये दिल्यानंतर तुम्ही एकाचवेळी तालुका , जिल्हा, राज्य या तिन्ही संघटनांचे सदस्य होत असता. सदस्य होणे ही तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असायला हवी, कारण आपण आपली जात अभिमानाने सांगतो तर सदस्यत्व असायलाच हवे. काहींनी तर यावर्षीपासून घरातल्या सर्व सदस्यांची नोंदणी करून एक वेगळाच पायंडा पाडलाआहे. या वर्षीची नोंदणी ३१ डिसेंबर पर्यंत चालेल. कृपया ५० रुपये भरून आपण रीतसर सदस्य व्हा. या वर्षीपासून म्हणजे आजपासून आपली कणकवली तालुका महिला नाभिक मंडळाची निर्मिती होत असून त्याला तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. वर्षभरात हे मंडळ नाभिक महिलांच्या हिताचे निर्णय घेऊन आपला विकास साधू शकतील.विविध उपक्रम राबवून समाजामध्ये आपले वेगळे स्थान दाखवू शकतील. त्यांनी ते तसे करावे आणि त्यात आमचीही मदत घ्यावी. अशाप्रकारे या वर्षीचा हा अहवाल मी सचिव, प्रवीण अशितोष कुबल आपणासमोर सादर करत असून त्यात काही गोष्टींचा उल्लेख राहून गेला असल्यास आपली सर्वांची क्षमा मागतो …..धन्यवाद.


No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...