Thursday, March 19, 2020

सिंधुदुर्ग सलून व्यावसायिकांनी २१ मार्च ते २३ मार्च सलूने बंद ठेवावी : अनिल अणावकर

कणकवली : दिनांक : २०/०३/२०२०
                    सध्या कोरोना संदर्भात काळजी करण्यापेक्षा काळजी घेणेच अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यानुसार संपूर्ण भारतभर कोरोनाची लागण होऊ नये यासाठी शासन उपाययोजना करत आहे. सर्वसामान्य नागरिकांना याबाबत जाणीवजागृती व्हावी म्हणून विविध प्रसारमाध्यमांकडून माहिती प्रसारित केली जात आहे. कोरोना हा संसर्गजन्य आहे , म्हणजेच व्हायरल आहे , तशाच याबाबतीतील कोणतीही माहिती सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली आहे. यात नाभिक समाजाचा व्यवसाय करणाऱ्या आणि हातावर पोट असणाऱ्या पारंपरिक सलूनधंदा करणाऱ्या गरीब बिचाऱ्या व्यावसायिकांच्या कामाविषयीचे ( विशेषतः दाढी - जी काही लोक दररोज करतात ) संदेश व्हायरल होऊ लागले आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक व्यावसायिक भावनिक झाले आहेत. त्यामुळे नाभिक व्यावसायिकांनी नाराज न होता आपली अविरत आरोग्यदायक सेवा देत राहावी, सर्व सलून व्यावसायिकांनी आपली आणि आपल्या गिऱ्हाईकांची कोरोनापासून काळजी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष विजय चव्हाण ( मालवण ) यांनी केले आहे.
                   आपली गिऱ्हाईके म्हणजेच आपले देव आहेत , त्यांची सेवा करून आम्ही आमची गुजराण करतो. तेच खरे आमचे मायबाप आहेत. असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाभिक बांधवांचे म्हणणे आहे. इतर समाजबांधवांचे  नाभिक समाजाबद्दलचे प्रेम सर्वानाच माहित आहे. असे हे प्रेमळ लोक नाभिक समाजाबद्दल कधीच वाईट बोलणार नाहीत किंवा वाईट समज करून घेणार नाहीत याबद्दल नाभिक समाजाला खात्रीच आहे. परंतु काही समाजकंटक नकारात्मक विचारसरणीचे लोक असतात , ज्यांच्यामुळे समाजाला नामुष्कीने जीवन जगण्याची पाळी येते. तसेच असे संदेश पुढे फॉरवर्ड करणाऱ्यांनी कृपया फॉरवर्ड करू नयेत अशी नम्र विनंतीही त्यांनी केली आहे.तरीही आपण लोकांची सेवा करण्याचे काम अधिक काळजीने सुरु ठेवून आपली विश्वासार्हता वाढवूया.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाभिक व्यावसायिकांनी २१ मार्च ते २३ मार्च असे तीन दिवस दुकाने बंद ठेवून भारत सरकारच्या आदेशांचे पालन करावे असेही आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे अध्यक्ष अनिल अणावकर यांनी केले आहे.
                    सध्या सभा घेता येत नसल्यामुळे नाभिक बांधवांना एकत्र करून मार्गदर्शक सूचना देण्याची इच्छा असूनही करता येत नाही , त्यामुळे टीव्ही आणि रेडिओ वरून येणाऱ्या संदेशाप्रमाणे आपण आपली काळजी घ्यावी आणि आपल्या गिऱ्हाईकांची काळजी घ्यावी. यासंदर्भात कणकवली तालुक्यातील नाभिक व्यावसायिकांनी ' मास्क ' चा वापर करत काम करणे सुरु केलेले आहे. तरी ज्यांच्यापर्यंत काळजी घेण्याविषयीचे संदेश पोचले नसतील त्यांनी असे चांगले संदेश नक्कीच पुढे फॉरवर्ड करावेत अशीही विनंती कणकवली तालुका नाभिक संघटनेचे सचिव प्रवीण कुबल यांनी केले आहे.










Tuesday, March 17, 2020

उद्या होणार कणकवली तालुका नाभिक संघटनेची तातडीची सभा ( फक्त पुरुष सदस्यांसाठी )

               कोरोना विषाणू  संसर्गजन्य असल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा, सिनेमागृहे, आठवडा बाजार आणि इतर कार्यालयांमधील सामाजिक कार्यक्रम यांच्यावर सध्या शासनाने आपत्कालीन कायदा लागू केला आहे. याची झळ नाभिक व्यावसायिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
              आपल्या गिऱ्हाईकांना चांगली सेवा देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे आणि आपण ते पार पाडत आहात याबद्दल शंका घेण्याचे मुळीच कारण नाही. पण दुसऱ्यांची सेवा करताना आता आपल्या नाभिक व्यावसायिक बांधवांच्या जीवावर सर्वात मोठे संकट येऊन ठेपले आहे.
               गिऱ्हाईकांना सेवा देणे हे आपले पहिले काम असले तरी आपल्या सेवेवर आपले मायबाप गिऱ्हाईके १०० % जो विश्वास दाखवतात त्याला तडा जाणार नाही याचीही आपण आता अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या सलून व्यावसायिकाला जीवावर उदार होऊन सेवा देत असताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
                त्यावर चर्चा विनिमय करण्यासाठी  कणकवली तालुका नाभिक संघटनेची तातडीची सभा उद्या बुधवार दिनांक १८ मार्च रोजी दुपारी ठिक २. ३० वाजता अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी आयोजित केली आहे. तरी सर्व नाभिक बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवून सभेला वेळीच उपस्थित राहावे ही कळकळीची विनंती आहे.
                तरी सदर मेसेज आपणांस प्राप्त झाल्यानंतर ज्यांच्याकडे whats app नसेल असे आपणास माहित असेल त्यांना विभागीय अध्यक्ष, सचिव, केंद्र संघटक यांनी हस्ते परहस्ते निरोप पोहोच करावा ही विनंती आहे.
                 आपण सर्व आपल्या संघटनेचे पाईक आहात, आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबवून ते लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. ते पोहोचवण्यासाठी तुमची सर्वांची मोलाची साथ लाभल्यामुळेच हे शक्य झाले आहे.
                 यावेळी आपले कस्टमर आणि आपण दोघेही गोंधळलेल्या मनस्थितीमधून जात आहोत. नक्की काय करावे हे समजेनासे झाले आहे. पण काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी , या सूत्रानुसार आपल्याला काम करावे लागणार आहे. तरी आपण याल अशी आशा बाळगतो.
                   आपला सचिव ( कुबलसर ) ..... कणकवली तालुका नाभिक संघटना 
( अधिकची सूचना : आपल्या समाजातील ब्युटीपार्लरचा व्यवसाय करणाऱ्या महिलांनीदेखील सभेला उपस्थित राहण्यास हरकत नाही. )

Monday, March 9, 2020

चंद्रशेखर सुरेश चव्हाण : एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व

                  गेली ४० वर्षे चंद्रशेखर चव्हाण यांना मी अगदी खास ओळखतो. एक शांत , संयमी असे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा उल्लेख केल्यास ते उचित ठरेल. आपल्या नाभिक संघटनेसाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. प्रसंगी आपल्या वैयक्तिक खाजगी जीवनातील अडीअडचणींना बाजूला ठेवून ते संघटनेसाठी , संघटनेच्या उत्कर्षासाठी धडपडताना मी गेली कित्येक वर्षे त्यांना पाहतो आहे. अगदी लहानपणापासून त्यांना ओळखत असल्याने त्यांच्याबद्दल मी सांगू शकतो. माझ्या भाऊमामांचे ते ज्येष्ठ पुत्र. त्यांचे घर म्हणजे आमचे आजोळ. ते आमचे आमच्यापेक्षा ५-६ वर्षांनी लहान असलेले मामेभाऊ आहेत. आता जरी आम्ही संघटनात्मक कार्य करीत असलो तरी लहानपणापासून एकत्र खेळलो, बागडलो. त्या आठवणी खूप मोलाच्या आहेत. त्यावेळी अगदीच साधा स्वभाव असलेले शेखरजी आज आपल्या जिल्हा संघटनेचे खजिनदार बनलेले आहेत. आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. कणकवली तालुका संघटनेचे जोमाने चाललेले काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. अनिल अणावकर, चंद्रशेखर चव्हाण आणि दशरथ ( पिंट्या चव्हाण ) यांच्या संकल्पनेतूनच गेली ४-५ वर्षे  ' नाभिक वारी ' संपन्न होत आहे. विविध उपक्रमांच्या संकल्पना त्यांच्याच असतात. त्या राबवण्याचे कार्य करत असताना त्यात पुढाकार शेखरभाई यांचा अग्रक्रमाने असतो. आम्ही त्यांना आमचे फक्त भाऊच मानत नाही तर चांगले मित्र समजतो.
                  कणकवलीत अत्याधुनिक " दिलखुष हेअर ड्रेसर्स " हे त्यांचे सलून लोकप्रिय झाले ते त्यांच्या प्रेमळ वागण्यामुळेच. त्यांना अभिमान आहे आपण नाभिक असल्याचा. त्यांनी आपले हे कार्य अधिक उत्साहाने करावे यासाठी त्यांना कणकवली तालुका नाभिक संघटनेकडून कोटी कोटी शुभेच्छा ....... त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा परिपूर्ण होवोत अशी मी भालचंद्र चरणी आणि संत सेने महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. HAPPY BIRTHDAY 


🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...