Tuesday, April 7, 2020

नाभिक व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळावी - अनिल अणावकर

नाभिक व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळावी - अनिल अणावकर                 कणकवली : दिनांक ०७/०४/२०२० :

२१ मार्चपासून १४ एप्रिल २०२० पर्यंत तब्बल २५ दिवस ‘ लॉकडाऊन ’ कालावधीमध्ये संपूर्ण सलून व्यावसायिक दुकाने बंद ठेवून शासनाला सहकार्य करत आहेत. ‘ कोरोना ’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी समस्त नाभिक व्यावसायिक आपापली दुकाने बंद ठेवून घरी थांबलेले आहेत.

बारा बलुतेदारांपैकी एक असलेला आमचा पारंपरिक नाभिक व्यावसायिक हातावरचे पोट असलेला उदरनिर्वाह करणारा बलुतेदार आहे. त्याला सध्या उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. रोज काम करून त्या मिळकतीवर आपल्या कुटुंबाची उपजीविका करणारा नाभिक भरडला गेला आहे. कायद्याचे काटेकोरपणे पालन
करीत गरीब बिचारा नाभिक घरी बसून सलून दुकाने उघडण्याची परवानगी मिळण्याची वाट पाहत बसलेला आहे.
कोणत्याही आकस्मिक निधीची तरतूद नसल्याने आमचे नाभिक बांधव व्याकुळ झालेले आहेत. मा. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा आपत्कालीन आर्थिक योजनेमधून काही आर्थिक निधीची तरतूद करून आमच्या नाभिक बांधवांना रोखस्वरूपात नुकसान भरपाई मिळावी , असे विनंती निवेदन कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , तालुका खजिनदार रमेश आचरेकर , संघटनेचे युवा नेते समीर चव्हाण , कणकवली नाभिक संघटनेचे सचिव प्रवीण कुबल या प्रतिनिधींनी दिले.

अजून एखादा आठवडा काम बंद असल्याने काही बांधव अक्षरशः रडकुंडीला आलेले आहेत. १४ एप्रिल नंतरही लॉकडाऊन सुरु राहणार असल्यास आमच्या नाभिक बांधवांचा पोटापाण्याचा प्रश्न आम्हाला पुढे सतत भेडसावणार आहे.तरी आमच्या मागणी अर्जाचा व निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असेही त्यांनी अर्जात म्हटले आहे. त्यावेळीअर्जासोबत कणकवलीतील सुमारे २१० नाभिक कारागिरांची यादीही दिलेली असून त्यांना आर्थिक किंवा जीवनावश्यक वस्तू मिळावेत अशीही  मागणी करण्यात आली.

आम्ही कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने फोनसंपर्क, whats app, फेसबुक , वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध करून दुकाने बंदच ठेवण्याचे कळकळीचे आवाहन केलेले आहे. तरीही कणकवली तालुक्यात काही गावांमधून , वाड्यांमधून जर आमचे नाभिक बांधव ग्राहकांच्या घरी जाऊन किंवा ग्राहकाला आपल्या घरी बोलावून जर नाभिक सेवा देत असतील तर ते आम्हाला समजू शकत नाही आणि असे जर घडत असेल तर नाभिक संघटनेला ते मान्य नाही.कारण असे केल्याने कोरोनाचा प्रसार झाल्यास आपण सर्वजण मोठ्या संकटात सापडू
शकतो.

     आमच्या नाभिक बांधवांना व अतिआग्रह करून काम करून घेणाऱ्या ग्राहकांना दोघांनाही कोरोना वाहक समजले जाऊ शकते. त्याचा फटका आमच्या प्रामाणिकपणे घरी बसून सहकार्य करणाऱ्या नाभिकांना विनाकारण बसू शकतो. तरी आपणास संघटनेच्या वतीने असे लेखी निवेदन करतो कि, कृपया आपल्या माध्यमातून आपण
आमच्या ग्राहकांना व त्यांची सेवा करणाऱ्या नाभिक बांधवांना समज द्यावी, जेणेकरून अशी गुप्तसेवा देणाऱ्या व करून घेणाऱ्या वृत्तीला आळा बसू शकतो, असेही जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी दिलेल्या निवेदनपत्रात म्हटले आहे.

कणकवली तहसीलदार म्हणाले कि , सध्या कोणताही नुकसानभरपाई निधी नसून देणगीदारांकडून प्राप्त जीवनावश्यक वस्तूंचे वितरण सुरु आहे. आत्यंतिक गरीब ५० ते ५५ नाभिक व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात तातडीची मदत दिली जाऊ शकते किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला कणकवलीमध्ये सुरु असलेल्या ' शिवभोजनाचा लाभ घेता येऊ शकतो असेही  त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळात नाभिक सेवा देणाऱ्या व घेणाऱ्या दोघांनाही वर्तमानपत्रात प्रसिद्धी देऊन आवाहन करणार असल्याचे सांगितले.


   

आज कणकवली नाभिक संघटना प्रतिनिधींनी घेतली तहसीलदारांची भेट





  • भेटीतील तपशील 
  • दिनांक ७ एप्रिल २०२० रोजी सकाळी १० ते १०.३० या वेळेत घेतली नियोजनपूर्वक भेट. 
  • भेटीच्या वेळी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , कणकवली खजिनदार रमेश आचरेकर, कणकवली सचिव प्रवीण कुबल आणि आर्किटेक्चर समीर चव्हाण होते उपस्थित. 
  • सर्वांनी मास्क घातलेला होता. 
  • तहसीलदार कणकवली यांनी ऐकून घेतले संघटना प्रतिनिधींचे म्हणणे 
  • कणकवली नाभिक कारागिरांना मदत मिळावी म्हणून केली गेली मागणी 
  • अत्यंत गरजू असलेल्या नाभिकांनाच मदत करण्याचे दिले गेले आश्वासन 
  • रेशनकार्डधारकांना मिळणार दरडोई ५ किलो इतके तांदूळ 
  • शासनाकडून याव्यतिरिक्त कोणतीही मदत जाहीर न झाल्याचे तहसीलदारांकडून स्पष्ट 
  • गरजू व्यक्तींसाठी दिली जाते दानशूर व्यक्तींकडून , संस्थांकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 
  • केले जाऊ शकते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 
  • यादीतील खरेच आवश्यक असलेल्या ५० ते ५५ पर्यंतच्या लाभार्थींना मिळू शकेल लाभ 
  • तरीही २१० कारागिरांची यादी आणि नुकसानभरपाई मिळणेबाबतचे निवेदन दिले गेले तहसीलदारांकडे 
  • घेतली गेली त्याची रीतसर पोहोच 
  • त्यानंतर ' कणकवली पोलीस निरीक्षकांकडे द्यावयाचे पत्र तयार करणेबाबत झाली फोनवरून चर्चा 
  • तहसीलदारांकडे विनंती करण्यात आली कि , नाभिक बांधव जर गावागावात , वाडी- वस्त्यांवर जर ग्राहकांच्या विनंतीला बळी पडून किंवा स्वतःहून ग्राहकांच्या घरी किंवा स्वतःच्या घरी जाऊन नाभिक सेवा देत असल्यास संघटनेला मान्य नसल्याबाबत व तहसीलदारांमार्फत प्रत्येक गावाच्या सरपंचाकडे किंवा पोलिसपाटलांकडे कालावण्याबाबत करण्यात आली मागणी 
  • बातमीच्या रूपाने तहसीलदार करणार नाभिक बंधूंना आवाहन : ग्राहकांची सेवा केल्यास ' कोरोना ' प्रसारक म्हणून काम करणाऱ्यांना होऊ शकते शिक्षा , काम करणाऱ्यांना आणि काम करून घेणाऱ्यांनाही होऊ शकते शिक्षा 
  • तहसीलदारांच्या परवानगीने घेतले गेले दोनच फोटो 

Friday, April 3, 2020

कणकवली तालुका सलूनधारकाची व कारागिरांची माहिती खालील नमुन्यात पाठवावी.

सलूनधारकाचे नाव -
पत्ता -
संपर्क क्रमांक -
आधार क्रमांक -
पहिल्या कारागीराचे नाव -
पत्ता -
संपर्क क्रमांक -
आधार क्रमांक -
दुसऱ्या कारागिरांचे नाव -
पत्ता -
संपर्क क्रमांक -
आधार क्रमांक -
तिसऱ्या कारागिरांचे नाव -
पत्ता -
संपर्क क्रमांक -
आधार क्रमांक -

Thursday, March 19, 2020

सिंधुदुर्ग सलून व्यावसायिकांनी २१ मार्च ते २३ मार्च सलूने बंद ठेवावी : अनिल अणावकर

कणकवली : दिनांक : २०/०३/२०२०
                    सध्या कोरोना संदर्भात काळजी करण्यापेक्षा काळजी घेणेच अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यानुसार संपूर्ण भारतभर कोरोनाची लागण होऊ नये यासाठी शासन उपाययोजना करत आहे. सर्वसामान्य नागरिकांना याबाबत जाणीवजागृती व्हावी म्हणून विविध प्रसारमाध्यमांकडून माहिती प्रसारित केली जात आहे. कोरोना हा संसर्गजन्य आहे , म्हणजेच व्हायरल आहे , तशाच याबाबतीतील कोणतीही माहिती सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली आहे. यात नाभिक समाजाचा व्यवसाय करणाऱ्या आणि हातावर पोट असणाऱ्या पारंपरिक सलूनधंदा करणाऱ्या गरीब बिचाऱ्या व्यावसायिकांच्या कामाविषयीचे ( विशेषतः दाढी - जी काही लोक दररोज करतात ) संदेश व्हायरल होऊ लागले आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक व्यावसायिक भावनिक झाले आहेत. त्यामुळे नाभिक व्यावसायिकांनी नाराज न होता आपली अविरत आरोग्यदायक सेवा देत राहावी, सर्व सलून व्यावसायिकांनी आपली आणि आपल्या गिऱ्हाईकांची कोरोनापासून काळजी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष विजय चव्हाण ( मालवण ) यांनी केले आहे.
                   आपली गिऱ्हाईके म्हणजेच आपले देव आहेत , त्यांची सेवा करून आम्ही आमची गुजराण करतो. तेच खरे आमचे मायबाप आहेत. असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाभिक बांधवांचे म्हणणे आहे. इतर समाजबांधवांचे  नाभिक समाजाबद्दलचे प्रेम सर्वानाच माहित आहे. असे हे प्रेमळ लोक नाभिक समाजाबद्दल कधीच वाईट बोलणार नाहीत किंवा वाईट समज करून घेणार नाहीत याबद्दल नाभिक समाजाला खात्रीच आहे. परंतु काही समाजकंटक नकारात्मक विचारसरणीचे लोक असतात , ज्यांच्यामुळे समाजाला नामुष्कीने जीवन जगण्याची पाळी येते. तसेच असे संदेश पुढे फॉरवर्ड करणाऱ्यांनी कृपया फॉरवर्ड करू नयेत अशी नम्र विनंतीही त्यांनी केली आहे.तरीही आपण लोकांची सेवा करण्याचे काम अधिक काळजीने सुरु ठेवून आपली विश्वासार्हता वाढवूया.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाभिक व्यावसायिकांनी २१ मार्च ते २३ मार्च असे तीन दिवस दुकाने बंद ठेवून भारत सरकारच्या आदेशांचे पालन करावे असेही आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे अध्यक्ष अनिल अणावकर यांनी केले आहे.
                    सध्या सभा घेता येत नसल्यामुळे नाभिक बांधवांना एकत्र करून मार्गदर्शक सूचना देण्याची इच्छा असूनही करता येत नाही , त्यामुळे टीव्ही आणि रेडिओ वरून येणाऱ्या संदेशाप्रमाणे आपण आपली काळजी घ्यावी आणि आपल्या गिऱ्हाईकांची काळजी घ्यावी. यासंदर्भात कणकवली तालुक्यातील नाभिक व्यावसायिकांनी ' मास्क ' चा वापर करत काम करणे सुरु केलेले आहे. तरी ज्यांच्यापर्यंत काळजी घेण्याविषयीचे संदेश पोचले नसतील त्यांनी असे चांगले संदेश नक्कीच पुढे फॉरवर्ड करावेत अशीही विनंती कणकवली तालुका नाभिक संघटनेचे सचिव प्रवीण कुबल यांनी केले आहे.










Tuesday, March 17, 2020

उद्या होणार कणकवली तालुका नाभिक संघटनेची तातडीची सभा ( फक्त पुरुष सदस्यांसाठी )

               कोरोना विषाणू  संसर्गजन्य असल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा, सिनेमागृहे, आठवडा बाजार आणि इतर कार्यालयांमधील सामाजिक कार्यक्रम यांच्यावर सध्या शासनाने आपत्कालीन कायदा लागू केला आहे. याची झळ नाभिक व्यावसायिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
              आपल्या गिऱ्हाईकांना चांगली सेवा देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे आणि आपण ते पार पाडत आहात याबद्दल शंका घेण्याचे मुळीच कारण नाही. पण दुसऱ्यांची सेवा करताना आता आपल्या नाभिक व्यावसायिक बांधवांच्या जीवावर सर्वात मोठे संकट येऊन ठेपले आहे.
               गिऱ्हाईकांना सेवा देणे हे आपले पहिले काम असले तरी आपल्या सेवेवर आपले मायबाप गिऱ्हाईके १०० % जो विश्वास दाखवतात त्याला तडा जाणार नाही याचीही आपण आता अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या सलून व्यावसायिकाला जीवावर उदार होऊन सेवा देत असताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
                त्यावर चर्चा विनिमय करण्यासाठी  कणकवली तालुका नाभिक संघटनेची तातडीची सभा उद्या बुधवार दिनांक १८ मार्च रोजी दुपारी ठिक २. ३० वाजता अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी आयोजित केली आहे. तरी सर्व नाभिक बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवून सभेला वेळीच उपस्थित राहावे ही कळकळीची विनंती आहे.
                तरी सदर मेसेज आपणांस प्राप्त झाल्यानंतर ज्यांच्याकडे whats app नसेल असे आपणास माहित असेल त्यांना विभागीय अध्यक्ष, सचिव, केंद्र संघटक यांनी हस्ते परहस्ते निरोप पोहोच करावा ही विनंती आहे.
                 आपण सर्व आपल्या संघटनेचे पाईक आहात, आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबवून ते लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. ते पोहोचवण्यासाठी तुमची सर्वांची मोलाची साथ लाभल्यामुळेच हे शक्य झाले आहे.
                 यावेळी आपले कस्टमर आणि आपण दोघेही गोंधळलेल्या मनस्थितीमधून जात आहोत. नक्की काय करावे हे समजेनासे झाले आहे. पण काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी , या सूत्रानुसार आपल्याला काम करावे लागणार आहे. तरी आपण याल अशी आशा बाळगतो.
                   आपला सचिव ( कुबलसर ) ..... कणकवली तालुका नाभिक संघटना 
( अधिकची सूचना : आपल्या समाजातील ब्युटीपार्लरचा व्यवसाय करणाऱ्या महिलांनीदेखील सभेला उपस्थित राहण्यास हरकत नाही. )

Monday, March 9, 2020

चंद्रशेखर सुरेश चव्हाण : एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व

                  गेली ४० वर्षे चंद्रशेखर चव्हाण यांना मी अगदी खास ओळखतो. एक शांत , संयमी असे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा उल्लेख केल्यास ते उचित ठरेल. आपल्या नाभिक संघटनेसाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. प्रसंगी आपल्या वैयक्तिक खाजगी जीवनातील अडीअडचणींना बाजूला ठेवून ते संघटनेसाठी , संघटनेच्या उत्कर्षासाठी धडपडताना मी गेली कित्येक वर्षे त्यांना पाहतो आहे. अगदी लहानपणापासून त्यांना ओळखत असल्याने त्यांच्याबद्दल मी सांगू शकतो. माझ्या भाऊमामांचे ते ज्येष्ठ पुत्र. त्यांचे घर म्हणजे आमचे आजोळ. ते आमचे आमच्यापेक्षा ५-६ वर्षांनी लहान असलेले मामेभाऊ आहेत. आता जरी आम्ही संघटनात्मक कार्य करीत असलो तरी लहानपणापासून एकत्र खेळलो, बागडलो. त्या आठवणी खूप मोलाच्या आहेत. त्यावेळी अगदीच साधा स्वभाव असलेले शेखरजी आज आपल्या जिल्हा संघटनेचे खजिनदार बनलेले आहेत. आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. कणकवली तालुका संघटनेचे जोमाने चाललेले काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. अनिल अणावकर, चंद्रशेखर चव्हाण आणि दशरथ ( पिंट्या चव्हाण ) यांच्या संकल्पनेतूनच गेली ४-५ वर्षे  ' नाभिक वारी ' संपन्न होत आहे. विविध उपक्रमांच्या संकल्पना त्यांच्याच असतात. त्या राबवण्याचे कार्य करत असताना त्यात पुढाकार शेखरभाई यांचा अग्रक्रमाने असतो. आम्ही त्यांना आमचे फक्त भाऊच मानत नाही तर चांगले मित्र समजतो.
                  कणकवलीत अत्याधुनिक " दिलखुष हेअर ड्रेसर्स " हे त्यांचे सलून लोकप्रिय झाले ते त्यांच्या प्रेमळ वागण्यामुळेच. त्यांना अभिमान आहे आपण नाभिक असल्याचा. त्यांनी आपले हे कार्य अधिक उत्साहाने करावे यासाठी त्यांना कणकवली तालुका नाभिक संघटनेकडून कोटी कोटी शुभेच्छा ....... त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा परिपूर्ण होवोत अशी मी भालचंद्र चरणी आणि संत सेने महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. HAPPY BIRTHDAY 


Tuesday, February 11, 2020

नाभिकांनो, व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जेन्टस ब्युटीपार्लर चालवा : कल्याणराव दळे

कणकवली : दिनांक : १० फेब्रुवारी २०२० :
          गेली एक महिनाभर सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटना जोमाने कार्य करत असून त्यांनी केलेले सांघिक कार्य वाखाणण्यासारखे आहे. संपूर्ण जिल्हाभरातील नाभिक बांधवांना एकत्र आणून आपण जी एकजूट दाखवून दिलीत त्याबद्दल राज्य नाभिक महामंडळाच्या वतीने मी सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे अभिनंदन करत आहे , असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ मुंबईचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी सिंधुदुर्ग नाभिक वधू वर परिचय मेळाव्याच्या सत्कार समारंभात कणकवली येथे व्यक्त केले.
           सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक मंडळाचा ' वधू वर परिचय मेळावा ' नुकताच कणकवलीत चौंडेश्वरी हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वानुमते निवड करण्यात आली. उदघाटक व प्रमुख वक्ते म्हणून बारा बलुतेदार संघटनेचे राज्याध्यक्ष कल्याणराव दळे , कणकवली नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित होते. राज्याचे नाभिक मंडळाचे उपाध्यक्ष विजय चव्हाण , रत्नागिरी जिल्हा नाभिक संघटनेचे यशवंत खराडे , रायगड जिल्ह्याचे महादेव चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
           कणकवली तालुका नाभिक महिला मंडळाने सुरेल आवाजात ईशस्तवन व स्वागतपद्य म्हणून कार्यक्रमाचा मंगलमय शुभारंभ केला. माजी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. मान्यवरांचा  शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांचा कल्याणराव दळे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
           सर्व तालुकाध्यक्ष, महिला अध्यक्ष , जिल्हा कमिटी सदस्य यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी सर्व सदस्यांना वस्तुरूप आठवण भेट दिली. नाभिक खेळाडूंना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दिक्षा नंदकिशोर चव्हाण ( नाभिक कॅरम कन्या पुरस्कार ) , अमित अरविंद चव्हाण ( नाभिक कबड्डी बॉय पुरस्कार ) , निलेश सुनिल चव्हाण ( नाभिक कराटे बॉय पुरस्कार ) असे पुरस्कार देऊन सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे वितरण करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अजय शिंदे, स्नेहा चव्हाण , गणेश चव्हाण, मनोज चव्हाण  यांनाही त्यांच्या विशेष कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. माजी जिल्हाध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. कै.यशवंत अणावकर, कै. स्वामी लाड , कै. दिगंबर चव्हाण, कै. चंद्रकांत चव्हाण यांच्या पत्नीचा , मुलांचा सत्कार करण्यात आला.
           कणकवली सचिव व सूत्रसंचालक प्रवीण कुबल आणि सूत्रसंचालिका विशाखा चव्हाण यांचाही शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. विठोबा चव्हाण, भाऊ चव्हाण, राज्य उपाध्यक्ष विजय चव्हाण , नगराध्यक्ष समीर नलावडे यांची मनोगतपर भाषणे झाली. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर म्हणाले कि, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझे नाभिक ज्ञाती बांधव जागरूकपणे लोकसेवा करत आहेत. जिल्हा मेळाव्याला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी अतिशय आनंद व्यक्त केला. नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले , सिंधुदुर्गात कणकवलीत ' नाभिक भवन ' होण्यासाठी मी प्रयत्नशील असून त्यासाठी मी नक्कीच पाठपुरावा करेन. माझ्या नाभिक मित्रांना मी नाराज करणार नाही असे अभिवचन त्यांनी दिले.
            वधू वर परिचय मेळाव्यामध्ये १६० पेक्षा जास्त वधू वरांनी भाग घेऊन परिचय करून दिला. सर्व स्वयंसेवक समित्या व नियोजन समित्यांनी केलेल्या कामाबद्दल जिल्हा सचिव सुधीर चव्हाण आणि मालवण तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर यांनी विशेष आभार मानले. कार्यक्रमाला १५०० पेक्षा जास्त नाभिक बंधू भगिनी उपस्थित होते. चिपळूण तिवरे येथील पुरात वाहून गेलेल्या नाभिक बांधवांसाठी जिल्ह्याच्या मेळाव्यात सामूहिकरीत्या श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या कुटुंबातून आलेल्या पूरग्रस्त अजित चव्हाण यांचाही आदर करण्यात आला.
              मेळाव्याचे औचित्य साधून सलून व्यवसायासाठी पूरक असे विविध स्टॉल लावण्यात आले होते. नाभिक पतसंस्थेचा सदस्य होऊन सहकार्य करावे असे आवाहन भाऊ चव्हाण यांनी केले. ' नाभिक पुराण ' हा ग्रंथ त्यांनी सवलतीच्या दरात विक्रीस ठेवला होता.

         



🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...