Saturday, October 30, 2021

कणकवली नाभिक संघटना कार्यकारिणी सभा : ३० ऑक्टोबर २१

 

शनिवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ च्या सभेचे इतिवृत्त 


🌐 सभेला एकूण ७५ पेक्षा जास्त पुरुष व महिला सदस्य उपस्थित होते.


🌐 अत्यंत महत्त्वाची तालुका कार्यकारिणी सभा अजिंड्याप्रमाणे संपन्न झाली.


🌐 प्रथमतः  देहावसान झालेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


🌐 मान्यवर पदाधिकाऱ्यांचे बुके देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. 


🌐 तालुकाध्यक्ष मा.लक्ष्मीकांत सुर्यकांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरु झाली. त्यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष मा. अनिल यशवंत अणावकर , जिल्हा उपाध्यक्ष मा. चंद्रकांत चव्हाण , जिल्हा सल्लागार मा. श्री. सुभाष चव्हाण , जिल्हा खजिनदार मा. चंद्रशेखर चव्हाण , कणकवली तालुका उपाध्यक्ष मा. रवी चव्हाण , खजिनदार मा. रमेश बाबाजी आचरेकर, फोंडा विभागिय अध्यक्ष मा. श्री. सुनिल चव्हाण, नांदगाव विभागीय अध्यक्ष मा. श्रीकांत टाकळे , तळेरे विभागीय अध्यक्ष मा. समीर चव्हाण , जिल्हा सदस्य मा. नंदकुमार चव्हाणसर , माजी जिल्हा उपाध्यक्ष मा. अशितोष कुबल उपस्थित होते. 


🌐 विषय क्र. १ ) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. 


मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. त्याला सर्वानुमते मंजुरी मिळण्याबाबत सभागृहासमोर विषय मांडण्यात आला. 


ठराव क्रमांक : १ ) 


असे ठरवण्यात येते कि , मागील सभेचे इतिवृत्त सभागृहाने व्यवस्थित ऐकले असून हे सभागृह त्यास सर्वानुमते मंजुरी देत आहे. 


        ठराव सर्वानुमते मंजूर 


सूचक :    श्री. रमेश बाबाजी आचरेकर     अनुमोदक :  श्री. श्रीकांत रमेश टाकळे        


🌐 विषय क्र. २ ) झालेल्या खर्चास मंजुरी घेणे. 


झालेला खर्च : १५२० रुपये ( संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम ) अखेरची शिल्लक : २०४८६ रुपये 


मागील सभेपासून झालेला खर्च सांगण्यात आला. त्यास मंजुरी देण्याबाबत सभेत विषय ठेवण्यात आला. 


ठराव क्रमांक : २ )  असे ठरवण्यात येते कि , 





  1. संत सेना महाराज पुण्यतिथीच्या दिवशी झालेला खर्च एकूण १५२० रुपये इतका झाला असून सदर झालेल्या खर्चास ही सभा कार्योत्तर मंजुरी देत आहे. 


  1.  झालेला खर्च : १५२० रुपये इतका खर्च आवश्यक कारणासाठीच झालेला असून त्यास ही सभा सर्वानुमते मंजुरी देत आहे. 



  1. आज रोजी संघटनेच्या खात्यावर अखेरची शिल्लक : २०४८६ रुपये इतका निधी शिल्लक असून पुढील होणाऱ्या खर्चास ही सभा कार्यपूर्व मंजुरी देत आहे. 


ठराव सर्वानुमते मंजूर 


सूचक : श्री. राजेश शिवराम चव्हाण                  अनुमोदक : श्री. शरद पुंडलिक लाड  



🌐 विषय क्र. ३ ) जिल्हाध्यक्ष यांनी सांगावयाचे विषय : 


जिल्हाध्यक्ष मा. अनिल अणावकर यांनी खालील विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. 


  1. सर्व सलून धारकांनी , कारागिरांनी संघटनेच्या नियमांचे व आचारसंहितेचे काटेकोर पाला केले पाहिजे, 

  2. सर्वांनी नेहमी ड्रेसकोड मध्ये दुकानात काम केले पाहिजे. 

  3. संघटनेने ठरवून दिलेले दरपत्रक वापरणे सर्वांना बंधनकारक आहे. दरासंदर्भात कोणीही नियमभंग करु नये. 

  4. कोरोना गेला नसून त्यासंदर्भात आपण ग्राहकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी युज अँड थ्रो Apron चा वापर करत राहिले पाहिजे. 

  5. आपण आपल्या ग्राहकाला नेहमी चांगल्या दर्जाची सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहायला हवा. 

  6. सर्वांनी आपल्या ज्ञातिबांधवांसोबतचे संबंध सुधारले पाहिजेत , ते बिघडू नयेत याची आपणच काळजी  घ्यायला हवी. 

  7. प्रत्येकाने आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात किंवा आपल्या दुकानाच्या नावाच्या बोर्डवर आपल्या संघटनेचा लोगो स्पष्ट दिसेल असा लावायला जमतो का प्रयत्न करा. जेणेकरून आपल्या संघटनेचे बोधवाक्य सर्वांना समजू शकेल व आपल्या मार्फत संघटनेची प्रसिद्धीसुद्धा होईल.

  8. आपल्या सलून व्यवसायात नव्याने येऊ पाहणाऱ्या युवापिढीचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले. त्यांचे हार्दिक स्वागत व अभिनंदन केले. शुभेच्छा दिल्या. 

  9. नाभिकेतर बांधव आपल्या धंद्यात उतरत असल्याने त्यांच्याशी आपल्याला स्पर्धा करायची असेल तर आपण कलाकार म्हणून कधीही कमी पडता कामा नये असेही आवाहन करुन त्यांनी सर्वांना जागृत केले. 

  10. परप्रांतीय लोक बाजारपेठ बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याने आपल्याला सतत त्यांच्याशी संघर्ष करत राहायला लागणार आहे. त्यामुळे मराठी बांधवांनी आपण आपल्या नाभिक बांधवांना कारागीर म्हणून कामास ठेवावे. परप्रांतीयांना कामावर ठेवल्यास त्याचे परिणाम भविष्यकाळात सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. 



🌐 विषय क्र. ४ ) विभागीय अध्यक्ष यांचे विषय :







सर्व विभागीय अध्यक्ष यांनी आपापल्या विभागात सभा घेण्याविषयी सुचित केले. खारेपाटण व तळेरे यांनीही सोमवार धरुन मिटिंग घेण्याची विनंती केली. नांदगाव व फोंडा यांनीही गुरुवार धरुन सभा घेण्याची विनंती केली. कनेडी विभागीय अध्यक्ष मा. नंदकिशोर चव्हाण यांनी आपल्या विभागातील एक नाभिक बांधव संघटनेचे नियम न पाळता सोमवारी दुकान उघडे ठेवत असल्याबाबत सांगितले. 


ठराव क्रमांक : ४ ) 


या नाभिक बांधवाला जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने एकदा प्रत्यक्ष समज देण्यात आली आहे. अजून

एकदा समज देण्यात येईल. त्यानंतर कणकवली संघटनेच्या वतीने त्या नाभिक बांधवाला लेखी सूचना देण्यात येईल. त्यानंतरही तो नाभिक बांधव नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्याचा विषय जिल्हा संघटनेकडे लेखी स्वरुपात कळवून मार्गदर्शन मागवण्यात येईल असा सर्वानुमते ठराव घेण्यात येत आहे. 


ठराव सर्वानुमते मंजूर 


सूचक : श्री. सुनिल गोपाळ चव्हाण ( फोंडा )         अनुमोदक : श्री. अनिल सहदेव शिंदे ( कलमठ ) 


🌐 विषय क्र. ५ ) लेखी अर्जाचे वाचन व चर्चा :


    श्री. प्रताप जाधव या नाभिकेतर तरुणाने तालुका अध्यक्ष मा. लक्ष्मीकांत चव्हाण यांच्याकडे लेखी स्वरूपात अर्ज दिलेला असून कणकवली नाभिक संघटनेची परवानगी मागितलेली आहे. त्यावर साधक बाधक चर्चा झाली असली तरी त्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष मा. अनिल अणावकर हे लवकरच त्यांना योग्य तो निर्णय देणार आहेत असे स्वतः जिल्हाध्यक्ष मा. अनिल अणावकर यांनी सांगितले असून त्याबाबत तेच निर्णय देतील. जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विचारुन ते निर्णय देतील , त्यामुळे नवीन सलून घालणाऱ्या प्रत्येक बांधवांनी कृपया संघटनेकडे सलून सुरु करीत असल्याबाबत लेखी परवानगी घ्यावी किंवा संघटनेला कळवून दुकान सुरु करावे. 


ठराव क्रमांक : ५ ) 

   

    असे ठरविण्यात येते कि , 

  1. मा. अनिल अणावकर ( जिल्हाध्यक्ष ) याबाबत योग्य तो निर्णय देतील. 

  2. त्यांचा निर्णय म्हणजे जिल्ह्याचा निर्णय असल्याने ते देतील तो निर्णय संघटनेला मान्य असेल. 

  3. हा निर्णय घेण्याअगोदर जिल्हाध्यक्ष जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करुनच योग्य तो निर्णय देतील. 


ठराव सर्वानुमते मंजूर 


सूचक : श्री. रोशन मनोहर चव्हाण ( हरकुळ )         अनुमोदक : श्री. संजय अनंत कुबल  ( आशिये  ) 


🌐 विषय क्र. ६ ) कारागिरांच्या समस्या समजून घेणे व त्यावर चर्चा करणे.


    काही कारागिरांनी वरील विषयावर आपापली मते मांडली . 





  1. श्री, अनिल शिंदे म्हणाले कि ज्येष्ठ नागरिकांना ६० वर्षानंतर काही आर्थिक साहाय्य मिळण्याच्या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न केले जावेत. दुर्धर आजार असलेल्यांच्याबाबतीतही विचार व्हायला हवा असेही ते म्हणाले. 

  2. कनेडी अध्यक्ष म्हणाले कि कनेडी बाजारातील सर्व सलून दुकाने सोमवारी बंद असतात. फक्त एक नाभिक बांधव आपले सलून उघडे ठेवतो. त्याच्यावर संघटनात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. 


वरील दोन्ही विषय महत्त्वाचे असल्याने त्यावर चर्चा झाली. 


🌐 विषय क्र. ७ ) नाभिक संवर्धन निधी निकष संमत करणे


१ ) सदर निधी कणकवली तालुका नाभिक संघटनेचा उपक्रम आहे.


२ ) या निधीचे नाव ' नाभिक संवर्धन निधी ' असे राहील.


३ ) संवर्धन याचा अर्थ संकटातून बाहेर पडणे , विकास करणे , वाढ करणे , पालन पोषण करणे , वृद्धी करणे , विस्तार करणे असा आहे.


४ ) हा ' नाभिक संवर्धन निधी ' कसा वापरायचा याबाबत दिलेल्या निकषांचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे.


५ ) या निधीच्या वापराविषयीचे सर्व निकष सभेने सर्वानुमते मान्य केलेले असणे महत्त्वाचे आहे.


६ ) निधीसाठी सर्व नाभिक बांधवांकडून ठराविक किमान १०० रुपये रक्कम मान्य करण्यात आली आहे. तरीही ज्यांना त्यापेक्षा अधिक रक्कम द्यायची इच्छा असल्यास ते देऊ शकतात.


७ ) हा निधी गोळा करण्याचा मूळ हेतू हा ' आकस्मिक व तातडीची मदत ' म्हणून करण्यात यावा असाच आहे. 


८ ) नाभिक संवर्धन निधी देणाऱ्या सदस्यांनाच या आकस्मिक व तातडीच्या मदतीचा लाभ मिळेल.


९ ) एकूण जमा झालेल्या निधीच्या २० % रक्कम दरवर्षी मदत म्हणून देण्यात येईल. उदा. १ लाख रुपये आरंभीची जमा असल्यास तिच्या २० % म्हणजे २०,००० इतकी रक्कम १० जणांना देऊ शकतो. म्हणजे प्रत्येक गरजू व्यक्तीला २००० रुपये इतकी रक्कम दिली जाऊ शकते. 


१० ) आकस्मिक निधन दुर्घटना , दुर्धर दीर्घ आजार , कार्यकारिणीने विचार विनिमय करुन ठरवलेला गरजू नाभिक यांनाच हा निधी दिला जाऊ शकतो.


११ ) कोणत्याही प्रकारे सदर निधी कर्जाऊ दिला जाणार नाही.


१२ ) सदर निधी देताना त्या कार्यक्षेत्रातील विभागीय अध्यक्ष , सचिव यांच्यासमक्ष निधी दिला जावा.


१३ ) आकस्मिक मदत दिली असली तरी त्याची रितसर पोहोच घेणे व देणे अत्यावश्यक राहील.


१४ ) ज्यांच्या बाबतीत काही आकस्मिक घटना घडली असल्यास कार्यक्षेत्रातील विभागीय अध्यक्ष , सचिव किंवा तालुक्यातील महत्त्वाचे पदाधिकारी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुनच तातडीच्या मदतीची मागणी करतील.


१५ ) मदत तातडीची असल्याने काहीवेळा एखाद्या पदाधिकाऱ्याने संघटनेच्या परवानगीने आपल्या खिश्यातील रक्कम दिली असल्यास त्यांना पुढील सभेच्या वेळीच सदर रकमेचा सर्वांसमक्ष चेक देण्यात येईल.




१६ ) पुरेशी रक्कम जमा झाल्यानंतरच तातडीची मदत देण्यासंदर्भात कार्यकारिणी सभेत पुन्हा विषय घेण्यात आल्यानंतरच उपक्रमाची सुरुवात होईल.


१७ ) एखाद्या सदस्याला एका वर्षात एकदाच मदत दिली जाऊ शकते. येथे कुटुंब असा उल्लेख केलेला नसून सदस्य असा करण्यात आला आहे. 


१८ ) नाभिक संवर्धन निधी हाती ठेवला जाणार नसून तो तीन सदस्यांच्या नावे बँक खात्यावर  जमा करण्यात येईल. तिघांच्या सहीनेच रक्कम काढता येईल. हे तीन सदस्य कोण असतील ते कार्यकारिणी सभा सर्वानुमते ठरवतील तेच कायम राहतील. पुढे त्यातील सदस्य संघटनेच्या नवीन ठरावांनी बदलले जाऊ शकतील असेच असतील.


१९ ) वैयक्तिक कामासाठी कधीही नाभिक संवर्धन निधी वापरता येणार नाही.


२० ) नाभिक संवर्धन निधी समाप्त झाल्यानंतर पुन्हा निधी गोळा केला जाऊ शकेल.


२१ ) हा संवर्धन निधी असल्याने तो निधी सर्वांना मिळाला पाहिजे असा कोणीही आग्रह धरता कामा नये.


२२ ) निधी संदर्भात काही तक्रार किंवा सूचना मांडायच्या असतील तर फक्त लेखी सूचनांचा विचार केला जाईल. कोणतीही फोनवरील तक्रार किंवा सूचना विचारात घेतली जाणार नाही. तसेच सुचनाकर्त्याने स्वतः सभेला उपस्थित राहून तक्रार मांडली पाहिजे. त्याचवेळी त्यांची लेखी तक्रार सन्मानपूर्वक स्विकारली जाईल व सर्वानुमते त्यावर तोडगा काढला जाईल.


२३ ) एकदा उपक्रम सुरु झाला की त्यात काही निकष अडचणीचे वाटल्यास त्यात पुढील सभेत सर्वानुमते घटना दुरुस्ती स्वरूपात बदल करता येईल.


२४ ) एखाद्याने १०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम संवर्धन निधीसाठी दिली असली तरी त्या सदस्यांना वरील निकषांचे पालन करुनच रक्कम देणे बंधनकारक असेल.


२५ ) ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच हा निधी गोळा करण्यात येईल. १ जानेवारी २०२२ पासून ' नाभिक संवर्धन निधी ' मदत स्वरूपात वितरित केला जाऊ शकतो.


🟥 संवर्धन निधी संदर्भात कोणतेही पावती पुस्तक छापले नसल्याने पावती त्वरित मिळणार नाही. पुरेसा निधी गोळा झाल्यानंतर संघटनेच्या आदेशानुसार जानेवारी २०२२ च्या सभेत आपणांस पावती मिळू शकेल. पण जरी पावती मिळाली नाही तरी दर सभेत संवर्धन निधीचा हिशेब देणे सचिव व अध्यक्षांना बंधनकारक राहील. 



ठराव क्रमांक : ६ )


असे ठरवण्यात येते कि,


  1. वरील २५ निकषांच्या अधीन राहून नाभिक संवर्धन निधी हा उपक्रम राबवण्यात यावा. 

 

    ठराव सर्वानुमते मंजूर 


सूचक : श्री. अनिल यशवंत अणावकर        अनुमोदक : श्री.निलेश पांडुरंग चव्हाण ( सातरल )



🌐 विषय क्र. ८ ) ई श्रम कार्ड बाबत माहिती देणे : 




    कणकवली तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांनी सायबर कॅफे मध्ये जाऊन आपापली कार्डे तयार करून घेणेबाबत सांगण्यात आले. .


ठराव क्रमांक : ७ ) 


    असे ठरवण्यात येते कि, 


  1. इ श्रम कार्ड हे असंघटित कारागिरांसाठीची योजना आहे. 

  2. ज्यांना हे कार्ड काढावयाचे आहे , ते स्वतः सायबर कॅफेमध्ये जाऊन हि नोंदणी करु शकतात. 

  3. याकार्डद्वारे भविष्यात काही फायदे मिळू शकतात. 

  4. त्यामुळे सर्व नाभिकबान्धवांनी हे कार्ड रजिस्टर करून घ्यावे असे आवाहन संघटनेमार्फत सर्वानुमते करण्यात आले. 


    ठराव सर्वानुमते मंजूर 


सूचक : श्री. चंद्रकांत रा. चव्हाण ( कनेडी )         अनुमोदक : श्री. संजय सि. चव्हाण ( सातरल )







🌐 विषय क्र. ९ ) नवीन कार्यकारिणी स्थापन करणे .  


कणकवली नाभिक संघटनेच्या कार्यकारिणीचा कार्यकाल संपत असल्यामुळे नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव सचिव श्री. प्रवीण कुबल यांनी सभेसमोर मांडला . कणकवली तालुका महिला सेलच्या नवीन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचेही शाब्दिक अभिनंदन करण्यात आले. जुनी कार्यकारिणी पुढील एक वर्षासाठी अजून कार्य करण्यासाठी ठरविण्यात आली. 


ठराव क्रमांक : ८ ) 


असे ठरवण्यात येते कि, 


  1. कणकवली शहर अध्यक्ष म्हणून मा. श्री. अनिल सहदेव शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

  2. इतर पदांवर जे आहेत त्यांना त्याच पदावर अजून एक वर्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. 

  3. कणकवली महिला तालुका अध्यक्षा म्हणून मा. सौ. तेजस्विनी तुळशीदास कुबल यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 

  4. कणकवली तालुका महिला उपाध्यक्षा म्हणून मा. सौ. रसिका रमेश आचरेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 

  5. कणकवली तालुका महिला सल्लागार म्हणून मा. सौ. भक्ती विलास चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 





  1. कणकवली तालुका महिला सचिव म्हणून मा. कु. हेमांगी अनिल अणावकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 

  2. सर्व माजी पदाधिकाऱ्यांचे मागील संघटनात्मक कामाबद्दल आभार मानण्यात आले. नवीन पदाधिकायांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 


    ठराव सर्वानुमते मंजूर 


सूचक : श्री. मनोज वसंत चव्हाण             अनुमोदक : पांडुरंग बाबुराव साळोखे 



🌐 विषय क्र. १० ) नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करणे : 


सर्वांचे जाहीर अभिनंदन करण्यात येऊन त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. 


ठराव क्रमांक : ९ ) 


असे ठरवण्यात आले कि ,


  1. सर्व नवनिर्वाचित सदस्य हे नवीन असल्याने त्यांना शुभेच्छा. 

  2. त्यांनी आपले सर्व उपक्रम पुढे सुरु ठेवावेत. 

  3. नवीन सदस्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात येत आहे. 


ठराव सर्वानुमते मंजूर 


सूचक : श्री. अनिल अणावकर         अनुमोदक : श्री. चंद्रशेखर चव्हाण. 


🌐 विषय क्र. ११ ) आयत्या वेळीचे विषय : कोणाचेही लेखी अर्ज नसल्याने चर्चा झाली नाही. 



🌐 कणकवली सचिव प्रवीण कुबल यांनी सर्वांचे आभार मानले. 


🟡  कणकवली तालुका नाभिक जनहितार्थ जारी


















Tuesday, October 19, 2021

कणकवली तालुका नाभिक महिला तालुकाध्यक्षा तेजस्विनी कुबल यांची सर्वानुमते निवड

 

 कणकवली : दिनांक 18 ऑक्टोबर 21

          सोमवारी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी कणकवली तालुका नाभिक महिला मंडळाची विशेष सहविचार सभा संपन्न झाली. 

          त्यावेळी काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी 15 पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. 

          कणकवली तालुका नाभिक महिला सल्लागार म्हणून माननीय भक्ती विलास चव्हाण यांची निवड झाली. तालुका उपाध्यक्षा म्हणून रसिका रमेश आचरेकर यांची निवड करण्यात आली. 

          कणकवली तालुका शहर विभागातील महिलांनी बचत गटाची स्थापना केली. माजी तालुकाध्यक्षा सन्माननीय संजना संजय चव्हाण यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा कार्यभार नूतन तालुकाध्यक्षा माननीय तेजस्विनी तुळशीदास कुबल यांच्याकडे सोपविला. त्याचप्रमाणे कणकवली तालुका महिला नाभिक मंडळाच्या सचिव ईश्वरी प्रवीण कुबल यांनीही सचिव पदाची धुरा कु. हेमांगी अनिल अणावकर यांच्या हाती दिली. 

          गेली तीन वर्ष सलग अत्यंत उत्कृष्ट काम केल्याबद्दल माजी तालुकाध्यक्षा संजना संजय चव्हाण यांचे महिला मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.त्याचप्रमाणे माजी उपाध्यक्षा माननीय प्रिया प्रताप चव्हाण यांनी यशस्वीपणे उपाध्यक्षा म्हणून काम केल्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले. 

          माजी तालुका सल्लागार माननीय दिप्ती दत्ताराम चव्हाण यांचेही आभार मानण्यात आले. 

          डिसेंबर महिन्यामध्ये कनेडी, फोंडा ,  खारेपाटण , नांदगाव , तळेरे आणि कणकवली या विभागांमध्ये नाभिक महिलांच्या वतीने दौरा काढण्याचे ठरवण्यात आले.





          कणकवली तालुका महिला सचिव कुमारी हेमांगी अनिल अणावकर यांनी उपस्थित सर्व  महिलांचे आभार मानले.

          सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष अनिल यशवंत अणावकर व महिला तालुका कार्याध्यक्षा प्रिया दशरथ चव्हाण यांनी स्वागत व अभिनंदन केले. त्यावेळी जय भवानी ग्रुपचे दशरथ चव्हाण उपस्थित होते. नवनिर्वाचित सचिव कुमारी हेमांगी अनिल अणावकर यांचेही कणकवली तालुका नाभिक संघटनेच्यावतीने विशेष कौतुक करण्यात आले.


©️ कणकवली तालुका नाभिक संघटना

Thursday, October 14, 2021

नाभिक महिला विशेष सहविचार सभा

 🔴 कणकवली तालुका नाभिक संघटना ( महिला सभा )

          कळवण्यात येते की सोमवार दिनांक 18 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारनंतर ठिक तीन वाजता जिल्हाध्यक्ष मा.अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी कणकवली तालुका महिला नाभिक संघटनेची विशेष सहविचार सभा घेण्यात येत आहे तरी सर्व महिलांनी सभेला वेळीच उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती.

🌐 सभेपुढील विषय


1️⃣ मागील सभेचे इतिवृत्त वाचन व मंजुरी 

2️⃣ बचत गट स्थापन करणे बाबत 

3️⃣ महिलांना पुरस्कार देणेबाबत 

4️⃣ सभासद फी गोळा करणे बाबत 

5️⃣ तालुका महिला सल्लागार निवड करणे

6️⃣ तालुका अध्यक्षा यांच्या परवानगीने येणारे विषय 

7️⃣ आयत्या वेळचे विषय


©️ सहसचिव / सचिव

 🟨 कु.हेमांगी अनिल अणावकर

कणकवली महिला नाभिक संघटना


🟦 सचिव किंवा सहसचिव उपस्थित नसल्यास तालुकाध्यक्षा  किंवा कार्याध्यक्षा यांची सभा परिपूर्ण करण्याची जबाबदारी राहील. 


🟪 सचिव ईश्वरी कुबल यांनी स्वेच्छेने सचिव म्हणून पूर्ण जबाबदारी कु. हेमांगी अनिल अणावकर यांच्याकडे दिली असून त्या स्वतः सहसचिव म्हणून यापुढे जबाबदारी स्वीकारतील.


©️ सचिव , कणकवली तालुका नाभिक संघटना

Monday, August 30, 2021

कार्यकारिणी सभा : सोमवार दिनांक : ३० ऑगस्ट २०२१ : सभेचे इतिवृत्त

  •  कणकवली : दिनांक ३० ऑगस्ट २०२१ : 

  1. दोन दिवस अगोदर कल्पना देऊन ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले. 
  2. सर्वांना वैयक्तिक Whats App मेसेज पाठवून कळविण्यात आले. 
  3. यापूर्वी दोन वेळा जिल्हा स्तरीय ऑनलाईन गुगल मीट घेतल्यामुळे काही नाभिक बांधवांना त्याची सवय झाली आहे ही उल्लेखनीय बाब आहे. 
  4. प्रत्येकाने आपल्याला घरातून मिटिंग अटेंड करण्याचा प्रयत्न केला. 
  5. मिटींगला ३० पेक्षा जास्त सदस्य , सदस्या  उपस्थित राहिल्याबद्दल आनंदच आहे. 
  6. सायंकाळी ५ ते ७ अशी दोन तासांची ऑनलाईन कार्यकारिणी सभा संपन्न झाली. 
  7. मिटींगला महिलांचे प्रमाण लक्षणीय होते ही जमेची बाब .म्हणायला हवी. 
  8. गोकुळाष्टमी असूनही खारेपाटण , कनेडी , नाटळ , कणकवली, कलमठ , जानवली, तळेरे , फोंडा येथील सदस्य उपस्थित होते. 
  9. अजूनही आपल्या लोकांना ' गुगल मीट ' चे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नसतील असा एक अंदाज व्यक्त करायला हरकत नाही. 
  10. सभा वेळेवर सुरु झाली. पण आपले सदस्य अजूनही वेळेचे महत्त्व जाणत नाहीत. सदस्य मिटिंग संपण्याच्या वेळेला हजर झालेले दिसले. जबाबदार अध्यक्ष , सचिव आणि नाभिक बांधवांकडून अशा प्रकारची अपेक्षा नसते. सर्वांनी वेळेचे बंधन पाळणे महत्त्वाचे आहे.
  11. सभेचे इतिवृत्त खालीलप्रमाणे : 
  12. सचिव श्री. प्रवीण कुबल यांनी सभेपुढील विषय सांगितले. तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण यांच्या अनुपस्थितीत सभेला सुरुवात झाली. उपस्थित जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या परवानगीने सभेला सुरुवात झाली. 
  13. भावपूर्ण श्रद्धांजली : आपल्या समाजातील बांधव कोविड किंवा वयोमानानुसार निवर्तले आहेत. त्यांना कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचप्रमाणे ' महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.शशिकांत चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. सर्व मृतात्म्यांना आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. जगातील , भारतातील , महाराष्ट्रातील , सिंधुदुर्गातील , कणकवलीतील सर्व मृतात्म्यांना कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. एक मिनिट स्तब्धता पाळण्यात आली. 
  14. सर्वांचे हार्दिक शाब्दिक स्वागत :  उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे शाब्दिक स्वागत करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मा. अनिल अणावकर , जिल्हा खजिनदार मा. चंद्रशेखर चव्हाण , जिल्हा सल्लागार मा. सुभाष चव्हाण , महिला तालुकाध्यक्षा मा. संजना चव्हाण , उपाध्यक्षा मा. प्रिया प्रताप चव्हाण , महिला सहसचिव मा. हेमांगी अणावकर, खारेपाटण विभागीय अध्यक्ष मा. अनंत चव्हाण , कनेडी विभागीय अध्यक्ष मा. नंदकिशोर चव्हाण , तळेरे विभागीय अध्यक्ष मा. समीर चव्हाण , जय भवानी समूहाचे पदाधिकारी मा. रोशन चव्हाण आणि उपस्थित होतील तसे सर्वांचे शाब्दिक स्वागत करण्यात आले. 
  15. मागील सभेचे इतिवृत्त वाचन व मंजुरी : २० फेब्रुवारी २०२१ रोजी प्रत्यक्ष सभा घेण्यात आली होती. त्या सभेचे इतिवृत्त वाचून दाखवण्यात आले. सदर इतिवृत्ताचे वाचन केल्यानंतर ' नाभिक संवर्धन निधी ' या मुद्द्यावर चर्चा झाली. त्या चर्चेत सर्वांनी आपला सहभाग नोंदवला. आपापली मते मांडली . 
  16. नाभिक संवर्धन निधीचे चर्चेतील सर्वसाधारण निकष :     
  • कणकवली तालुका नाभिक संवर्धन निधी फक्त कणकवली नाभिकांसाठी वापरण्यात यावा. 
  • प्रत्येक विभागीय अध्यक्षांनी आपापल्या विभागातील निधी गोळा करावा. 
  • ज्या सदस्यांनी नाभिक संवर्धन निधीसाठी काही रक्कम दिली असेल त्यांनाच त्या निधीतून तात्काळ मदत देता येऊ शकते. ज्यांनी या निधीमध्ये आपली पदरमोड केलेली नसेल त्यांना या निधीमधून तात्काळ मदत देता येणार नाही. 
  • एका महिन्यातून एक किंवा दोन जणांना तात्काळ मदत देण्यासंदर्भात चर्चेचा सूर होता. 
  • संवर्धन निधी गोळा करताना त्यासाठी वेगळे पावतीपुस्तक छापून त्या लेखाशिर्षाखालीच पावती देऊन रक्कम जमा करता येऊ शकते. 
  • जमा केलेली रक्कम हाती न ठेवता संघटनेच्या वेगळ्या म्हणजेच संवर्धन खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल. ज्यांना रक्कम दिली जाईल त्यांच्या नावे चेक देण्यात येईल. रोख रक्कम दिली जाणार नाही. 
  • विविध आजार लक्षात घेऊन त्यांची प्रसंगानुरूप आवश्यकता लक्षात घेऊन रक्कम देण्यात येईल. 
  • कमीतकमी १००० व जास्तीत जास्त २००० इतकी तात्काळ मदत देण्यात येईल. 
  • आपल्या कणकवली तालुक्यात जर २०० कारागीर आहेत असे मानले तर प्रत्येकी १०० रुपये एकावेळेला संवर्धन निधी जमा केला तर तो २०००० रुपये इतका जमा होईल. 
  • ज्यांना त्याहीपेक्षा जास्त रक्कम जमा करावयाची असेल तर ते स्वखुशीने देऊ शकतात. पण १०० रुपये ही कमीत कमी रक्कम असेल. 
  • यासाठी एक वेगळी ' संवर्धन निधी समिती ' नेमण्यात येईल. त्यांच्या निर्णयानुसार निधीचा ' तात्काळ ' विनियोग केला जाईल. या निधीचा वेगळा हिशेब ठेवण्यात येईल. समितीचा निर्णय अंतिम असेल.
  • साध्या आजारासाठी निधी न मागता खरोखर गरज असेल तरच निधी मागावा. 
  • निधी मागताना लेखी रीतसर अर्ज करावा. 
  • एखाद्याने निधीसाठी आपली रक्कम दिली आहे आणि त्यांना तात्काळ मदत मिळाली नाही असे होऊ शकते. प्रत्येकालाच हा निधी मिळाला पाहिजे हे महत्त्वाचे नसून ज्यांच्यावर आकस्मिक प्रसंग ओढवला आहे , आणि त्यांची परिस्थितीही नाही , त्यांनाच आपल्याला हा ' मदतीचा हात ' सर्वांनी मिळून देत आहोत ही महत्त्वाची बाब सर्वांनी लक्षात घ्यावी. 
  • वरील निकष हे तात्पुरते असून त्यात बदल होऊ शकतात. उपस्थित सदस्यांनी हे निकष सांगितले आहेत. अनुपस्थित लोकांनी आपली मते मांडायला हरकत नाही. त्यासाठी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून विचार व्यक्त करायला हरकत नाही. पुढील दहा दिवस आपण यावर विचार व्यक्त करू शकता. जर आपल्या कोणाकडूनही विचार व्यक्त केले गेले नाहीत तर ' नाभिक संवर्धन निधी समिती ' च्या माध्यमातून निकषांबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. 
  1. संघटनात्मक कार्याचा आढावा
  2. सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या संकेतस्थळावरील ' नाभिक शौर्य पुरस्कार , पूरग्रस्तांना मदत ' चे व्हिडीओ दाखवण्यात आले. मा. अनिल अणावकर यांनी मार्गदर्शन केले. 
  3. विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण मुलांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 
  4. गाऊ नाचु सेनानंदे : २०२१ या सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या उपक्रमाबद्दल चर्चा झाली. त्यात सहभागी सर्वांचे कौतुक करण्यात आले. कु. दिक्षा नंदकिशोर चव्हाण ( कॅरम गर्ल ) ही सभेला उपस्थित होती. तिचेही सर्वांनी कौतुक केले व तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 
  5.  संत सेना महाराज पुण्यतिथी : २०२१ : नियोजन व चर्चा : येत्या ४ सप्टेंबर रोजी आपल्या संतांची पुण्यतिथी येत असून त्या पुण्यतिथी सोहळ्याचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा झाली. सर्वांनी आपापले विचार मांडले. जिल्हाधीकारी सिंधुदुर्ग यांनी जमावबंदी आदेश काढला असल्याने यंदाही आपल्याला साध्या पद्धतीनेच पुण्यतिथी साजरी करावी लागणार आहे. त्यासाठी आपल्याकडे असलेल्या शिल्लक निधीमधूनच खर्च करण्याबाबत ठराव संमत करण्यात आला. तसेच पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने आदल्यादिवशी शुक्रवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी दुपारी ठिक ३ वाजता कणकवली शहरातील सर्वांनी मा. अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी उपस्थित राहण्याचे ठरले. 
  6. नवीन सदस्यांचे व नवीन सलून दुकान चालक , मालक यांचे अभिनंदन व शुभेच्छा : कणकवलीत सतत बदल घडत असताना आपल्या नाभिक बांधवांना आपले नवीन दुकान असावे असे वाटते. काही बांधव आपल्या संघटनेला त्यात सामील करून घेतात, काही घेत नाहीत असे दिसते. तरी यापुढे असे घडू नये याची काळजी घ्यावी. आपल्या आनंदात आपण आपल्या नाभिक बांधवांना सामील करून घेऊन संघटनेस लेखी पात्र देऊन आमंत्रित करण्यासंदर्भात ठराव घेण्यात आला. 
  7. आयत्या वेळेचे विषय व आलेल्या अर्जांचे वाचन व चर्चा :  यावेळी कोणतेही आयत्या वेलीचे विषय झाले नाहीत. तसेच कोणतेही लेखी अर्ज नसल्यामुळे चर्चा झाली नाही. 
  8. सचिव श्री. प्रवीण कुबल यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले. 




🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...