Tuesday, February 11, 2020

नाभिकांनो, व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जेन्टस ब्युटीपार्लर चालवा : कल्याणराव दळे

कणकवली : दिनांक : १० फेब्रुवारी २०२० :
          गेली एक महिनाभर सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटना जोमाने कार्य करत असून त्यांनी केलेले सांघिक कार्य वाखाणण्यासारखे आहे. संपूर्ण जिल्हाभरातील नाभिक बांधवांना एकत्र आणून आपण जी एकजूट दाखवून दिलीत त्याबद्दल राज्य नाभिक महामंडळाच्या वतीने मी सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे अभिनंदन करत आहे , असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ मुंबईचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी सिंधुदुर्ग नाभिक वधू वर परिचय मेळाव्याच्या सत्कार समारंभात कणकवली येथे व्यक्त केले.
           सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक मंडळाचा ' वधू वर परिचय मेळावा ' नुकताच कणकवलीत चौंडेश्वरी हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वानुमते निवड करण्यात आली. उदघाटक व प्रमुख वक्ते म्हणून बारा बलुतेदार संघटनेचे राज्याध्यक्ष कल्याणराव दळे , कणकवली नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित होते. राज्याचे नाभिक मंडळाचे उपाध्यक्ष विजय चव्हाण , रत्नागिरी जिल्हा नाभिक संघटनेचे यशवंत खराडे , रायगड जिल्ह्याचे महादेव चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
           कणकवली तालुका नाभिक महिला मंडळाने सुरेल आवाजात ईशस्तवन व स्वागतपद्य म्हणून कार्यक्रमाचा मंगलमय शुभारंभ केला. माजी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. मान्यवरांचा  शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांचा कल्याणराव दळे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
           सर्व तालुकाध्यक्ष, महिला अध्यक्ष , जिल्हा कमिटी सदस्य यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी सर्व सदस्यांना वस्तुरूप आठवण भेट दिली. नाभिक खेळाडूंना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दिक्षा नंदकिशोर चव्हाण ( नाभिक कॅरम कन्या पुरस्कार ) , अमित अरविंद चव्हाण ( नाभिक कबड्डी बॉय पुरस्कार ) , निलेश सुनिल चव्हाण ( नाभिक कराटे बॉय पुरस्कार ) असे पुरस्कार देऊन सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे वितरण करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अजय शिंदे, स्नेहा चव्हाण , गणेश चव्हाण, मनोज चव्हाण  यांनाही त्यांच्या विशेष कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. माजी जिल्हाध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. कै.यशवंत अणावकर, कै. स्वामी लाड , कै. दिगंबर चव्हाण, कै. चंद्रकांत चव्हाण यांच्या पत्नीचा , मुलांचा सत्कार करण्यात आला.
           कणकवली सचिव व सूत्रसंचालक प्रवीण कुबल आणि सूत्रसंचालिका विशाखा चव्हाण यांचाही शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. विठोबा चव्हाण, भाऊ चव्हाण, राज्य उपाध्यक्ष विजय चव्हाण , नगराध्यक्ष समीर नलावडे यांची मनोगतपर भाषणे झाली. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर म्हणाले कि, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझे नाभिक ज्ञाती बांधव जागरूकपणे लोकसेवा करत आहेत. जिल्हा मेळाव्याला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी अतिशय आनंद व्यक्त केला. नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले , सिंधुदुर्गात कणकवलीत ' नाभिक भवन ' होण्यासाठी मी प्रयत्नशील असून त्यासाठी मी नक्कीच पाठपुरावा करेन. माझ्या नाभिक मित्रांना मी नाराज करणार नाही असे अभिवचन त्यांनी दिले.
            वधू वर परिचय मेळाव्यामध्ये १६० पेक्षा जास्त वधू वरांनी भाग घेऊन परिचय करून दिला. सर्व स्वयंसेवक समित्या व नियोजन समित्यांनी केलेल्या कामाबद्दल जिल्हा सचिव सुधीर चव्हाण आणि मालवण तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर यांनी विशेष आभार मानले. कार्यक्रमाला १५०० पेक्षा जास्त नाभिक बंधू भगिनी उपस्थित होते. चिपळूण तिवरे येथील पुरात वाहून गेलेल्या नाभिक बांधवांसाठी जिल्ह्याच्या मेळाव्यात सामूहिकरीत्या श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या कुटुंबातून आलेल्या पूरग्रस्त अजित चव्हाण यांचाही आदर करण्यात आला.
              मेळाव्याचे औचित्य साधून सलून व्यवसायासाठी पूरक असे विविध स्टॉल लावण्यात आले होते. नाभिक पतसंस्थेचा सदस्य होऊन सहकार्य करावे असे आवाहन भाऊ चव्हाण यांनी केले. ' नाभिक पुराण ' हा ग्रंथ त्यांनी सवलतीच्या दरात विक्रीस ठेवला होता.

         



🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...