Tuesday, August 23, 2022

🛑 संत सेनामय नाभिक मेळा

🛑 संत सेनामय नाभिक मेळा

          नाभिक समाजाचे संत शिरोमणी सेना महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य होते. सोप्या पद्धतीने पुण्यदिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पुण्यतिथी ही उत्सवासारखी साजरी करणं हे माणसाच्या बाबतीत खरं ठरेल कदाचित. पण संत सेना हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा पुण्यदिन म्हणजे आमच्यासाठी त्यांचं स्मरण करत नाभिक समाजासाठी कार्य करत राहणं असा दिवस असतो. त्या दिवशी जल्लोष करायचा नसेलही , पण त्यांच्या पुण्यदिनाच्या निमित्ताने समाजासाठी थोडं पुण्य कर्म करता आलं तर या एकमेव उद्देशाने प्रेरित होत होतो. 

          कणकवली तालुका संघटनेचा विद्यमान सरचिटणीस म्हणून जबाबदारी होतीच. ती नुसती पार पाडायची नव्हती तर चांगल्या प्रकारे अंमलात आणण्याचे महत्त्वाचे कार्य घडवून आणायचे होते. मनात विचारांचं मंथन सुरु झालं. मनातील विचार शब्दबद्ध झाले. 

          सभेत अजिंड्यावर विषय ठेवले. सर्वांनी सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा केली. सोपा आणि साधा कार्यक्रम भक्तिमय , समाजाभिमुख आणि प्रबोधनपर व्हावा याची ओढ लागली होती. निमंत्रणे दिली गेली. छापील निमंत्रणे पोहोच केली. संदेश पाठवले. प्रसिद्धी केली. 

          नाभिक बांधवांनी तुफान गर्दी करत संत सेना महाराजांचे दर्शन घेतले. त्यानिमित्ताने सर्व नाभिक बांधव दोन ते तीन वर्षांनी एकत्र आले. भक्तिभावाने पूजन करुन आरती करण्यात आली. सर्वजण सुस्वर आरत्या म्हणताना भक्तिरसात न्हाऊन गेल्याचे दिसत होते. 

          भिरवंडे गावातून तीन गायिका मुली आल्या होत्या. त्यांचे संगीत भजन ऐकण्याची आतुरता शिगेला पोहोचली होती. सहावीत शिकणारी दिव्या सुमधुर आवाजात गात होती. तिचं गायन थेट हृदयाला जाऊन भिडलं. बाहेरचे श्रोते ऐकत होतेच. कोणीतरी म्हणाले , " तुम्ही सुंदर गाण्यांची कॅसेट लावली आहे का ? " आमची दिव्या संगीताचे दिव्य गुण घेऊन आली आहे. तिच्या आवाजात जादू आहे. तिने तिच्या अभंगांच्या तालावर भक्तिरसात तुडुंब भिजायला लावले होते. तिच्यासोबत आलेल्या दोन्ही मुलींनी अभंग , गवळणींचे आत्मविश्वासपूर्वक सादरीकरण केले.  

          त्यानंतर समारंभपूर्वक कार्यक्रम सुरु झाले. मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन उद्घाटन झाले. कणकवली महिला समुपदेशक रोजा खडपकर यांनी सोशल मिडिया , पोलीस , न्यायालय आणि मोबाईल याविषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन केले. त्यांचा महिला आघाडीकडून हृदय सत्कार करण्यात आला. सर्व ज्येष्ठांचा सत्कार झाला. सत्काराच्या वेळी या सर्व ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद पाहता आला. तो आनंद असाच आजन्म टिकून राहावा असं वाटतं. पुण्यदिनानिमित्त आमच्या ह्या सर्व ज्येष्ठांमध्ये संत सेना महाराजांचा वास असल्याचे लक्षात येत होते. 

          दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करणं हे आमचं नेहमीचं उद्दिष्ट असतं. त्यानिमित्ताने त्या मुलांची ओळख होते. त्या मुलांनाही संघटनेविषयी आपुलकी वाटण्याची सुरुवात या उपक्रमाने साध्य होत असते. हिच मुले आमची भावी पिढी आहेत , त्यांना योग्य संस्कार देणं , त्यांना आकार देणं हेही आमचं मोठ्यांचं कर्तव्यच. ते आम्ही किती पार पाडतो हे मी सांगू शकत नसलो तरी प्रयत्न मात्र नक्कीच करतो. 

          महिला आघाडीने उत्तम उभारी घेतली आहे. विविध उपक्रम राबवत असताना त्यांनी अधिकाधिक महिलांना सक्रिय करण्याचं उद्दिष्ट त्यांना लवकरच साध्य करायचे आहे. आमची महिला आघाडी समर्थपणे ही जबाबदारी पेलेल याचाही ठाम विश्वास वाटतो. हेमांगीच्या रुपाने एक हुशार महिला सचिव महिला आघाडीला नेहमीच आघाडीवर ठेवेल हा वर्तमानकाळ आहेच आणि भविष्यात काही उज्ज्वल घडवण्याची शक्यता महिला आघाडीची टीम करुन देते आहे. 

          जय भवानी ग्रुपच्या वतीनं निबंध स्पर्धेसाठी मिळालेली आकर्षक प्रशस्तीपत्रे पाहत राहावीत अशी बनली आहेत. महिला आघाडीने दिलेली प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत होती. 

          एवढं सगळं करत असताना प्रत्येक विभागातून मिळालेला उदंड प्रतिसाद याला चार चांद लावून गेला होता. कणकवली , कनेडी , फोंडा , नांदगाव , तळेरे , खारेपाटण , ओसरगाव अशा विभागातून आलेले सर्व नाभिक बंधू भगिनी शेवटपर्यंत थांबले होते. 

          कार्यक्रम सुरु असताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिपक बेलवलकर यांनी भेट दिली आणि उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिलेली भेट अविस्मरणीय अशीच होती. त्यांच्या प्रोत्साहनपर शब्दांनी प्रत्येकात संघटनेबद्दल अधिक आपुलकी निर्माण होईल यात शंका नाही. 

          लकी ड्रॉ हा एक गमतीचा खेळ. शेवटपर्यंत उपस्थित राहणाऱ्यांसाठी त्याचे लाभ मिळतात म्हणून थांबावे लागते असे असले तरी आकर्षणबिंदू असल्याने पुढे पुढे जाताना कंटाळा येत नाही हेही तितकेच खरे. 

          प्रत्येक सदस्याने आपली वार्षिक वर्गणी देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांनी दिली नसेल ते नक्की देतीलच , कारण नाभिक असल्याचा सर्वानाच सार्थ अभिमान आहे ना !

          वार्षिक पुण्यतिथी वर्गणी रक्कम थोडी जास्त वाटली तरी ती वार्षिक आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. संघटनेचे विविध उपक्रम करायचे असतील तर ते आर्थिक पाठबळाशिवाय संपन्न होऊ शकत नाहीत. त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद असावी लागते. एकदा ठरवलेली वर्गणी सर्वांनी समान देणं ही काळाची गरज आहे. त्यात कमी जास्त असा भेद होऊ शकत नाही. ज्या विभागांनी काही कारणांमुळे ठरवलेली वर्गणी दिली नसेल ते नक्कीच वर्गणी देतील. आता चतुर्थीचे दिवस जवळ येत आहेत. सलून दुकानातील काम वाढेलच. त्यातील काही रक्कम बाजूला काढून संघटनेसाठी ठरलेली रक्कम देण्यास कोणाचाही विरोध राहणार नाही असाही विश्वास वाटल्याशिवाय राहात नाही. गणराया सर्वांना सुबुद्धी देवो आणि प्रत्येकाला बरकत देवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. 

          कणकवली तालुका नाभिक संघटनेचे उपक्रम नेहमीच काही शिकवणारे असतात या गोष्टीचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो. कायमच पाठीशी राहून सतत साथ देणाऱ्या माझ्या नाभिक शिलेदारांना माझा मानाचा मुजरा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )






















































































































































































🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...