१० मार्च २०२५ रोजी आपल्या कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने संपन्न झालेला कार्यक्रम ही तुमच्या संघटनेवरच्या प्रेमाची पोचपावतीच आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढत वाढत उच्चांक गाठला. तुमचे सर्वांचे आभार मानणे माझे कर्तव्यच आहे. तरीही तुमचे येणे तुम्ही आमच्यासाठी दिलेली अप्रतिम अशी भेट होती. तुम्ही यापुढेही आमच्या सर्व उपक्रमांमध्ये असेच बहुसंख्येने सहभागी व्हाल याबद्दलचा माझा आत्मविश्वास अधिकाधिक वृद्धिंगत होत चालला आहे.
आपल्या कणकवली नाभिक संघटनेवर जिल्ह्याचे प्रेम आहे. ते कालच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिक ठळकपणे दिसून आले आहे. सावंतवाडी , कुडाळ , देवगड आणि मालवण तालुक्यातून आलेले जिल्हा , राज्य पदाधिकारी या घटनेचे साक्षीदार आहेत. त्यांच्या उपस्थितीने खरंच आमच्या कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढत जात होती. जिल्ह्याने आणि राज्यानेही आपले प्रेम असेच ठेवावे अशी संत सेना महाराजांकडे प्रार्थना करतो.
एक शाखा संघटना एवढा मोठा कार्यक्रम करु शकते हा विश्वास कणकवली तालुक्यातील सर्व विभागातील नेतृत्वाने आम्हाला दिला आहे. ज्यावेळी तालुका एकत्र येतो तेव्हाच असे भव्य दिव्य समाजकार्य घडू शकते हे आपण सर्वांनी जिल्ह्याला आणि राज्यालासुद्धा आपल्या कार्याने दाखवून दिले आहे.
आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अधिक कार्य करण्याची प्रेरणा देणारे आमचे प्रेरणास्थान मा. अनिलजी अणावकरसाहेब , कार्याध्यक्ष मा. चंद्रशेखरजी चव्हाण आणि त्यांच्या सोबत अहोरात्र कार्य करण्यासाठी धडपडणारी कणकवली नाभिक संघटनेची पुरुष आणि महिलांची टिम यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. या कार्यक्रमाची नियोजनपुर्वक तयारी करुन ती तडीस नेणारी महिला मंडळाची टिम म्हणूनच श्रेष्ठ ठरते. महिला मंडळाला कितीही सलाम ठोकले तरीही ते कमीच पडतील इतके त्यांनी काम केलेले आहे.
महिलांची ‘ पैठणी ’ मिळविण्यासाठी जी चढाओढ सुरु होती ते पाहून चकित व्हायला झाले. महिलांमधील सुप्त गुणांना काल खऱ्या अर्थाने वाव मिळाला होता. महिला आत्मविश्वासाने सांगितलेल्या सर्व गोष्टी करताना दिसत होत्या. दुसऱ्या महिला बोलत असताना त्यांचे कौतुक करत होत्या. ही खिलाडूवृत्तीच त्यांना पुढे नेणारी आहे. महिला एकत्र आल्या कि असं उत्तुंग कार्य करण्याची क्षमता त्यांच्यात आहेच आहे हे कालच्या कार्यक्रमाने समस्त पुरुषांना दाखवून दिले आहे. महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. त्यांनी यशाची शिखरं जिंकावीत यासाठीचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता. पुढील आयुष्यात अजून अनेक संकटांना सामोरे जाताना असंच हसतखेळत सामोरे जाल याबद्दलही खात्री वाटते आहे.
कालच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांचे सत्कार झाले. हे सर्व सत्कार आपले प्रत्येकाचे होते ही गोष्ट लक्षात असावी. कारण तुमच्यापैकी काही लोकांनी त्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. सर्वांची नावे घेणं शक्य नाही. कालच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांचे हातभार लाभले आणि त्यामुळेच कार्यक्रम अपेक्षेपेक्षाही फुलत गेला.
वालावलकर भावोजी यांनी सर्व महिलांना शेवटपर्यंत खिळवून ठेवलं होते ही जमेची बाजू आहे. आमच्या नाभिक महिलांचा उदंड प्रतिसाद बघून सर्व मान्यवर खुश झालेले दिसत होते. अनेकांनी ते माझ्याकडे वैयक्तिकही बोलून दाखवले. कार्यक्रम एकट्याच्या जीवावर अजिबात होत नसतो. त्यासाठी सर्वांचे हात लागत असतात. त्यासाठीच संघटनारुपी अनंत हातांची साखळी बनते तेव्हा खऱ्या अर्थाने कार्यकत्याला हुरुप येतो. काल आम्हां सर्वच कार्यकर्त्यांना हुरुप देण्याचं काम आपण सर्वांनी केलेलं आहे. तुमचे सर्वांचे आभार किती किती मानू ? खरंच माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही सर्वांनी आपल्या घरातल्या कार्यक्रमासारखं केलंत . तुम्ही असताना किती आनंद होतो म्हणून सांगू ? आमच्या कणकवली नाभिक संघटनेचं तुम्ही फार मोठं बळ आहात. हे बळ प्रत्येक कार्यक्रमात अधिकाधिक वाढत जाईल याबद्दल मला खात्री आहेच. पुनश्च सर्वांचे आभार मानून मी आजचा माझा पत्रप्रपंच थांबवतो. मी आपला कायमचा ऋणी आहे.
आपला विश्वासू ,
Rubal
तालुका सरचिटणीस
कणकवली तालुका नाभिक संघटना



































































































































































No comments:
Post a Comment