महिलांनी नियमित योगाभ्यास करा : योगशिक्षिका ज्योती पंडित
कणकवली नाभिक संघटनेचा हळदीकुंकू सोहळा संपन्न
कणकवली दिनांक : ३ फेब्रुवारी २०२१
महिलांनी फक्त चुल आणि मुल यात न अडकता घराबाहेर पडायला हवे. स्वतःच्या शरीराकडे व मनाकडे लक्ष द्यायला हवे. ताणतणावावर नियंत्रण आणण्यासाठी आपले जीवन योगमय करायला हवे. महिलांनी आपल्या निकोप आरोग्यासाठी नियमितपणे योगाभ्यास करावा , असे प्रतिपादन योगशिक्षिका ज्योती वामन पंडित यांनी कणकवली महिला नाभिक संघटनेच्या हळदीकुंकू समारंभात केले.
जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या महिला मंडळाचा ' सुवासिनी वाण प्रदान ' सोहळा संपन्न झाला. त्यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्षा संजना चव्हाण , कार्याध्यक्षा प्रिया दशरथ चव्हाण , उपाध्यक्षा प्रिया प्रताप चव्हाण , तालुका सल्लागार दिप्ती चव्हाण , जिल्हा सदस्या रचना चव्हाण , महिला सचिव ईश्वरी कुबल , सहसचिव हेमांगी अणावकर आणि योगशिक्षिका ज्योती पंडित उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. संपदा चव्हाण , तेजस्विनी कुबल व प्रिया चव्हाण यांनी ईशस्तवन व स्वागतपद्य सादर केले. तालुका सचिव प्रवीण कुबल यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी तथा योगवल्लरी योगशाळेच्या योगशिक्षिका ज्योती वामन पंडित यांनी महिलांना उत्तम मार्गदर्शन व योगप्रबोधन केल्याबद्दल कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तालुकाध्यक्ष संजना चव्हाण यांनी उपस्थित नाभिक महिलांना संघटनात्मक एकत्र येण्याचे आवाहन केले. तालुका सल्लागार दिप्ती चव्हाण यांनी हळदीकुंकू समारंभाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्याध्यक्षा प्रिया दशरथ चव्हाण यांनी ८ मार्च रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याची विनंती केली. हळदीकुंकू समारंभाचे औचित्य साधून सर्व महिलांनी उखाणी घेतली. सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पाडल्याबद्दल सहसचिव हेमांगी अणावकर यांनी उपस्थित ५० पेक्षा जास्त महिलांचे मनापासून आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका सचिव प्रवीण कुबल यांनी केले.










No comments:
Post a Comment