Thursday, March 19, 2020

सिंधुदुर्ग सलून व्यावसायिकांनी २१ मार्च ते २३ मार्च सलूने बंद ठेवावी : अनिल अणावकर

कणकवली : दिनांक : २०/०३/२०२०
                    सध्या कोरोना संदर्भात काळजी करण्यापेक्षा काळजी घेणेच अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यानुसार संपूर्ण भारतभर कोरोनाची लागण होऊ नये यासाठी शासन उपाययोजना करत आहे. सर्वसामान्य नागरिकांना याबाबत जाणीवजागृती व्हावी म्हणून विविध प्रसारमाध्यमांकडून माहिती प्रसारित केली जात आहे. कोरोना हा संसर्गजन्य आहे , म्हणजेच व्हायरल आहे , तशाच याबाबतीतील कोणतीही माहिती सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली आहे. यात नाभिक समाजाचा व्यवसाय करणाऱ्या आणि हातावर पोट असणाऱ्या पारंपरिक सलूनधंदा करणाऱ्या गरीब बिचाऱ्या व्यावसायिकांच्या कामाविषयीचे ( विशेषतः दाढी - जी काही लोक दररोज करतात ) संदेश व्हायरल होऊ लागले आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक व्यावसायिक भावनिक झाले आहेत. त्यामुळे नाभिक व्यावसायिकांनी नाराज न होता आपली अविरत आरोग्यदायक सेवा देत राहावी, सर्व सलून व्यावसायिकांनी आपली आणि आपल्या गिऱ्हाईकांची कोरोनापासून काळजी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष विजय चव्हाण ( मालवण ) यांनी केले आहे.
                   आपली गिऱ्हाईके म्हणजेच आपले देव आहेत , त्यांची सेवा करून आम्ही आमची गुजराण करतो. तेच खरे आमचे मायबाप आहेत. असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाभिक बांधवांचे म्हणणे आहे. इतर समाजबांधवांचे  नाभिक समाजाबद्दलचे प्रेम सर्वानाच माहित आहे. असे हे प्रेमळ लोक नाभिक समाजाबद्दल कधीच वाईट बोलणार नाहीत किंवा वाईट समज करून घेणार नाहीत याबद्दल नाभिक समाजाला खात्रीच आहे. परंतु काही समाजकंटक नकारात्मक विचारसरणीचे लोक असतात , ज्यांच्यामुळे समाजाला नामुष्कीने जीवन जगण्याची पाळी येते. तसेच असे संदेश पुढे फॉरवर्ड करणाऱ्यांनी कृपया फॉरवर्ड करू नयेत अशी नम्र विनंतीही त्यांनी केली आहे.तरीही आपण लोकांची सेवा करण्याचे काम अधिक काळजीने सुरु ठेवून आपली विश्वासार्हता वाढवूया.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाभिक व्यावसायिकांनी २१ मार्च ते २३ मार्च असे तीन दिवस दुकाने बंद ठेवून भारत सरकारच्या आदेशांचे पालन करावे असेही आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे अध्यक्ष अनिल अणावकर यांनी केले आहे.
                    सध्या सभा घेता येत नसल्यामुळे नाभिक बांधवांना एकत्र करून मार्गदर्शक सूचना देण्याची इच्छा असूनही करता येत नाही , त्यामुळे टीव्ही आणि रेडिओ वरून येणाऱ्या संदेशाप्रमाणे आपण आपली काळजी घ्यावी आणि आपल्या गिऱ्हाईकांची काळजी घ्यावी. यासंदर्भात कणकवली तालुक्यातील नाभिक व्यावसायिकांनी ' मास्क ' चा वापर करत काम करणे सुरु केलेले आहे. तरी ज्यांच्यापर्यंत काळजी घेण्याविषयीचे संदेश पोचले नसतील त्यांनी असे चांगले संदेश नक्कीच पुढे फॉरवर्ड करावेत अशीही विनंती कणकवली तालुका नाभिक संघटनेचे सचिव प्रवीण कुबल यांनी केले आहे.










No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...